शिक्षण दहावी, मालमत्ता कोट्यवधींची, विधानपरिषदेत ट्विस्ट आणणाऱ्या नार्वेकरांची संपत्ती किती.?

शिक्षण दहावी, मालमत्ता कोट्यवधींची, विधानपरिषदेत ट्विस्ट आणणाऱ्या नार्वेकरांची संपत्ती किती.?




मुंबई वार्ताहर

विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सचिव मिलिंद नार्वेकर यांना उतरवत मोठा ट्विस्ट आणला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेल्या मिलिंद नार्वेकरांचं संसदीय राजकारणातील हे पहिलंच पाऊल आहे. खरं तर ठाकरेंकडे स्वतःच्या आमदारांच्या जोरावर नार्वेकरांना निवडून आणण्याचं संख्याबळ नाही, तरीही त्यांनी विश्वासाने नार्वेकरांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे पदार्पणातच नार्वेकरांच्या पराभवाचा धोका टाळण्याची काळजी ठाकरेंनी नक्कीच घेतली असणार.

मिलिंद नार्वेकरांच्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे, परंतु सर्वपक्षीय मधुर संबंधांमुळे त्यांनी जमवलेली मित्ररुपी संपत्ती आता त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत तारणार का? असा प्रश्न आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या निवडणूक शपथपत्रात माहिती काय.?

शिक्षण - दहावीपर्यंत
एकही गुन्हा दाखल नाही
बँकेत ७४ लाख १३ हजार रुपये
रोख रक्कम - ४५ हजार, पत्नीकडे ३६ हजार
नार्वेकर दाम्पत्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने
सोने ३५५ ग्रॅम (२४ लाख ६७ हजारांचं बाजार मूल्य)
चांदी १२.५६ किलो, (९ लाख ७४ हजारांचं बाजार मूल्य)
शेअर्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक
दापोली तालुक्यात ७४ एकर जमीन, बीड तालुक्यातही जमीन

कोण आहेत मिलिंद नार्वेकर.?

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनेक वर्षांपासून नार्वेकर हे ठाकरे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत .ते मुंबई टी२० लीगचे अध्यक्षही आहेत. याशिवाय तिरुपती देवस्थान मंडळावरही ते सदस्य आहेत. आतापर्यंत मिलिंद नार्वेकर यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झालेला नव्हता. दरम्यान, ११ जागांच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने सद्यस्थितीत निवडणूक होणे अटळ मानले जात आहे. महाविकास आघाडीकडे दोन उमेदवारांना जिंकवून आणण्याइतका कोटा असताना तीन उमेदवार मैदानात आहेत. मात्र गुप्त मतदानात फाटाफुटीचा धोका किंवा संधी असल्याने दोन्ही बाजूंना धाकधूक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post